Thursday, October 31, 2013

मावळती

का कोसळतोय आज पाऊस ?
कुठली खोलवर रुतलेली कळ
वर उगवून येतेय परत..
स्वप्नांचा चुरा झाला तरी त्यात
का दिसताहेत हे चंद्रकण..
आणि एकेका कणातून पुन्हा
जुनंच स्वप्नं का जन्म घेतंय ?
चंद्र पहाडी काळोखातून उगवून
पहाटेच्या पाण्यात मावळला..
उगवतीची ती वेदनामय वेळ
आणि मावळतीची ही शांत सल..
मधल्या अज्ञातात तरंगत राहीली
अनोळखी वाटांची वेडी तुडवण..
सूर येत राहतीलच.. पण..
श्वासांना मरणतंद्रीच्या लयीची
पाणनीळ धून कोण देणार ?
साऊलपाणी.. पाणसावली..

खूप दूरून येताहेत आवाज
साद कि प्रतिसाद आहेत हे..
कि माझ्याच हाकांचे प्रतिध्वनी ?
सुन्नावस्थेतल्या माळावरच्या
दूरध्वनींच्या तारांचा आवाज
डोक्यात वाजत राहतो माझ्या..
रानवाऱ्याचा आवाजही मग
मिसळून वितळून जातो त्यात..
इतका क्रूर खेळ का आहे हा ?
नं खेळताही का खेळला जातोय..
मला नाही खेळायचं आता
मला शांत झोपायचंय.. थकून.
झोपेच्या लघुमरणकुशीत
शिरायचंय मला चार दिवस..
पुन्हा जन्माला यायला
नवं जग नजरेत बांधायला..

पण ओंजळीतलं पाणी आटलंय..
आणि आयुष्याच्या या पटलावर
शून्यही दिसत नाही आताशा..
पुन्हा कोंब फुटण्याआधीच
जाळून टाकले पाहिजेत मला
हे मृगजळाच्या बियांचे कोठार.

why not put out the lights when
there's nothing more to look at..
जाणीवांचे बहर शिशिर जसे
तळहातावरून सरकून जावेत
असे शब्द संवेदनेत उतरत नाहीत..
मग वाटतं आता थांबावं इथेच
झावळ्यांच्या मंद सावलीत..
कवडशांचा खेळ बघत– निर्विकारपणे.
पण पाऊस का कोसळतोय आज
अजून काय वाहून जायचं राहिलंय..

- सई

Saturday, October 19, 2013

प्रत्यावर्ती

कधी येशील?
फिरून
सावरून
कि हरवून
..........अंधारल्यावर?

कुठे थांबू?
घरात
रानात
कि अज्ञातात
..........सांजवाटेवर?

काय भेटेल?
सत्वं
स्वत्वं
कि तरलता
..........वितळल्यावर?

कसं असेल?
हिरवं पातं
कोवळं नातं
कि कोमेजेल
..........बहरल्यावर?

कशी सोसेल
?
विराणी
निशाणी
कि आठवण
..........परतल्यावर?

- सई

Thursday, October 17, 2013

स्थलांतर

अंधारल्या कोनाड्यात
फडफडती जुनेच रावे
परिसर सोडुनी आता
कुण्या दूर देशी जावे ?

आस कुठे स्वप्नं कुठे
कुठे मंद हलती काजवे
भाव होत जात पारखे
कुठे दूर रानी न कळावे

सोलता साल कधी मी
अंतरंग पुन्हा हेलकावे
तेच गाणे जुने मनाचे
आता वाटे पुन्हा गावे..

पाहुनी मोकळे आकाश
पारव्यांची तार भुलावे
चांदणपाण्याच्या वाटेने
क्षितीजप्रवासा निघावे..

- सई

Friday, October 4, 2013

स्वप्नंभूल

Between the shores of
Me and Thee..
there is the loud ocean,
my own surging self,
which I long to cross..


कशा रे वाट्याला आल्या
रविंद्रनाथांच्या या ओळी..
दिशांची मोजदाद विसरून
कुण्या वाटेने आलो इथवर..
वाऱ्यासवे कसे उडून गेले
त्या तंद्रबंदी स्वप्नांचे सूर..

कुठल्या दरीतून उगवेल
प्रेमाचा संजीवन मंत्र..
आपल्यात तर उभे आहे
नेणीवांचे हे अनाम धुके..
किती रे झिजवला जीव
शरीराचीही पिंजण झाली..
अजूनही का येत नाही
नव्या उभारीची चाहूल..
का फिटत नाही अजूनही
जुन्या मरणवेळांची सल..

अंगांगाला झोंबतेय बघ
जर्द निळ्या बर्फाचे वारे..
पांघरणीला कुठून आणू
कुठल्या शब्दांचे लक्तर..
जीवाला दिलासा म्हणुन..
माझ्या फाटक्या पदरात
हे चरण उरलंय फक्त..

डोळ्यात रे फडफडती
पाखरांच्या पंखओळी..
स्वप्नंपाण्यात पडती
रानफुलांच्या ओंजळी..

- सई

Monday, September 30, 2013

अनवती

धुंद उभारी उसासे कोवळे.. घट्ट मिठी, ह्रदय पाणी जसे
निःश्वास सोडले दीर्घ कधी.. कधी जीवाला क्षुद्र दिलासे

लाजिरवाणे तर कधी लाजरे.. धीट कधी, कधी वेंधळे हसे
डोळा भेटी जिवा गाठी पडती.. म्हणे मोकळे रे सोड जरासे

का उभारला भयान पट हा.. गरजांची बुळबुळ, स्वप्नं रुसे
ईश्वरतेचे अन् जातीधर्माचे.. नाटक सगळे जगी विलासे

नश्वरतेने सहज सोपे केले.. माझे इवलेसे जगणे असे
शरीरमनाच्या ओढीला देवू.. उगा कशाला व्यर्थ खुलासे

येईल कशी पापण्यांना नीज.. पुन्हा स्वप्नं आज नवे दिसे
मज हाकेला प्रतिसाद जसा.. सुगंध तुझा वाऱ्यासवे येतसे

- सई