Wednesday, July 31, 2013

अंतप्रहर

हवेत झप्पर उडवुन छप्पर
गेला वारा माळावर तत्पर
शब्दपाण्याचा झोत सारुनी
आत उगवला काळा पत्थर

घेत गिरकी पिसाट भिंगर
जात लयाला हाकेची लकेर
उजाडावरती हिरवट काळी
तरी उगवते आस रानभर

अशाच वेळी टांग जीवाचे
अनाम सुंदर काळे झुंबर
रात्र सजवाया मी गुंफते रे
वांझ स्वप्नांची मंद झालर

काही केल्या होत नसे रे
इंद्रियांची भलावण तत्पर
डोळा पाणी आण नाहीतर
टाक पुन्हा मायेचा मंतर

- सई

Sunday, July 28, 2013

एकांतप्रवास

चारचौघांमधे उठताबसता
विसरायला झालेलं सत्वं
संभाषणतोल जपताजपता
उथळ झालेलं माझं बोलणं..
हलक्याशा दगडगवतातून
खुळखुळणारा जीवाचा झरा
तीव्र कडाउंचीच्या अंतराने
कर्णकर्कश धबधबा होतो रे..

नात्यांमधल्या अडचणींवर
काढलेले यंत्रतांत्रिक उपाय
उमाळ्यांना थारा नाही मग
समंजसपणे जुळवून घेणं..
रानफुलांची शेती केलेली
पाहिलीयेस का तू कधी?
बांध घालून गवताबरोबर
कसं झुलता येईल त्यांना..

कंटाळलेले रे मी तशा
गर्दीतल्या एकटेपणाला
मोकळी झालेय कधीच
त्या जखड एकटवासातून..
अंधाऱ्या हिमरानातल्या
या खोल दरीतूनच जसं
गरूडाला ऐकू यावं धुंद
मरणभुलीचं संगीत..

मुक्तपणे अनुभवतेय
समृद्ध एकांतवासात
कलावंतांच्या सोबतीने
अन्‌ जीवाच्या साक्षीने..
शेवाळलेल्या पाण्याने
ओल मिळेना म्हणून
पाखरं उडून आलीयेत
या वाहत्या झऱ्याकाठी..

गर्दीतल्या एकटेपणापासून
एकांतवासापर्यंतचा प्रवास
उलटपावलांनी पुसून आज
तू परतायला सांगतोयेस?
कालही पाऊस पडला इथे
पुन्हा फुटून वाहतंय पाणी
त्याला तुझ्या त्या जगाचे
बांध घालू म्हणतोस?

नाही जमणार मला..

जग सारून ये म्हटलं
तर येशील तू इथे?

वाट नाही पाहत मी आता..

- सई

Wednesday, July 17, 2013

स्पर्श

आसावलेली रात
डोळा नाही नीज
स्पर्श स्वप्नातले
मागताती वीज

काळोख काठावर
हले वाऱ्याने रान
शिरे गाभाऱ्यात
तुझे चांदण-ऊन

कधी याच गावी
स्पर्श भारावलेले
माझ्या प्राक्तनाचे
आभाळ सांडलेले

आता जाग नाही
सुन्न साऱ्या ग्रंथी
बर्फाचे घर माझे
हरवले सर्व साथी

बर्फाचे घर माझे
हरवले सर्व साथी..

- सई

Friday, July 12, 2013

संचित

विजनवासी संचितातल्या
काही फटींमधुन
निसटणारा वारा
सोडला तर
शरीराला
कसली गुंतवण नाही.

किड लागू नये
म्हणुन घरातल्या
धान्याबरोबर
परसदारात
आतडीही
वाळू घातलीयेत.

धग कमी होऊन
कुज
फोफावणार नाही
याची व्यवस्था
आत्मजाळाने
सांभाळलीय.

अन् स्वप्नमाळेतुन
ओघळून
वितळणाऱ्या
निरासक्त क्षणांचे
मणी न्याहळत
मी उभी आहे..

..काठावर.

- सई