Thursday, October 31, 2013

मावळती

का कोसळतोय आज पाऊस ?
कुठली खोलवर रुतलेली कळ
वर उगवून येतेय परत..
स्वप्नांचा चुरा झाला तरी त्यात
का दिसताहेत हे चंद्रकण..
आणि एकेका कणातून पुन्हा
जुनंच स्वप्नं का जन्म घेतंय ?
चंद्र पहाडी काळोखातून उगवून
पहाटेच्या पाण्यात मावळला..
उगवतीची ती वेदनामय वेळ
आणि मावळतीची ही शांत सल..
मधल्या अज्ञातात तरंगत राहीली
अनोळखी वाटांची वेडी तुडवण..
सूर येत राहतीलच.. पण..
श्वासांना मरणतंद्रीच्या लयीची
पाणनीळ धून कोण देणार ?
साऊलपाणी.. पाणसावली..

खूप दूरून येताहेत आवाज
साद कि प्रतिसाद आहेत हे..
कि माझ्याच हाकांचे प्रतिध्वनी ?
सुन्नावस्थेतल्या माळावरच्या
दूरध्वनींच्या तारांचा आवाज
डोक्यात वाजत राहतो माझ्या..
रानवाऱ्याचा आवाजही मग
मिसळून वितळून जातो त्यात..
इतका क्रूर खेळ का आहे हा ?
नं खेळताही का खेळला जातोय..
मला नाही खेळायचं आता
मला शांत झोपायचंय.. थकून.
झोपेच्या लघुमरणकुशीत
शिरायचंय मला चार दिवस..
पुन्हा जन्माला यायला
नवं जग नजरेत बांधायला..

पण ओंजळीतलं पाणी आटलंय..
आणि आयुष्याच्या या पटलावर
शून्यही दिसत नाही आताशा..
पुन्हा कोंब फुटण्याआधीच
जाळून टाकले पाहिजेत मला
हे मृगजळाच्या बियांचे कोठार.

why not put out the lights when
there's nothing more to look at..
जाणीवांचे बहर शिशिर जसे
तळहातावरून सरकून जावेत
असे शब्द संवेदनेत उतरत नाहीत..
मग वाटतं आता थांबावं इथेच
झावळ्यांच्या मंद सावलीत..
कवडशांचा खेळ बघत– निर्विकारपणे.
पण पाऊस का कोसळतोय आज
अजून काय वाहून जायचं राहिलंय..

- सई

Saturday, October 19, 2013

प्रत्यावर्ती

कधी येशील?
फिरून
सावरून
कि हरवून
..........अंधारल्यावर?

कुठे थांबू?
घरात
रानात
कि अज्ञातात
..........सांजवाटेवर?

काय भेटेल?
सत्वं
स्वत्वं
कि तरलता
..........वितळल्यावर?

कसं असेल?
हिरवं पातं
कोवळं नातं
कि कोमेजेल
..........बहरल्यावर?

कशी सोसेल
?
विराणी
निशाणी
कि आठवण
..........परतल्यावर?

- सई

Thursday, October 17, 2013

स्थलांतर

अंधारल्या कोनाड्यात
फडफडती जुनेच रावे
परिसर सोडुनी आता
कुण्या दूर देशी जावे ?

आस कुठे स्वप्नं कुठे
कुठे मंद हलती काजवे
भाव होत जात पारखे
कुठे दूर रानी न कळावे

सोलता साल कधी मी
अंतरंग पुन्हा हेलकावे
तेच गाणे जुने मनाचे
आता वाटे पुन्हा गावे..

पाहुनी मोकळे आकाश
पारव्यांची तार भुलावे
चांदणपाण्याच्या वाटेने
क्षितीजप्रवासा निघावे..

- सई

Friday, October 4, 2013

स्वप्नंभूल

Between the shores of
Me and Thee..
there is the loud ocean,
my own surging self,
which I long to cross..


कशा रे वाट्याला आल्या
रविंद्रनाथांच्या या ओळी..
दिशांची मोजदाद विसरून
कुण्या वाटेने आलो इथवर..
वाऱ्यासवे कसे उडून गेले
त्या तंद्रबंदी स्वप्नांचे सूर..

कुठल्या दरीतून उगवेल
प्रेमाचा संजीवन मंत्र..
आपल्यात तर उभे आहे
नेणीवांचे हे अनाम धुके..
किती रे झिजवला जीव
शरीराचीही पिंजण झाली..
अजूनही का येत नाही
नव्या उभारीची चाहूल..
का फिटत नाही अजूनही
जुन्या मरणवेळांची सल..

अंगांगाला झोंबतेय बघ
जर्द निळ्या बर्फाचे वारे..
पांघरणीला कुठून आणू
कुठल्या शब्दांचे लक्तर..
जीवाला दिलासा म्हणुन..
माझ्या फाटक्या पदरात
हे चरण उरलंय फक्त..

डोळ्यात रे फडफडती
पाखरांच्या पंखओळी..
स्वप्नंपाण्यात पडती
रानफुलांच्या ओंजळी..

- सई

Monday, September 30, 2013

अनवती

धुंद उभारी उसासे कोवळे.. घट्ट मिठी, ह्रदय पाणी जसे
निःश्वास सोडले दीर्घ कधी.. कधी जीवाला क्षुद्र दिलासे

लाजिरवाणे तर कधी लाजरे.. धीट कधी, कधी वेंधळे हसे
डोळा भेटी जिवा गाठी पडती.. म्हणे मोकळे रे सोड जरासे

का उभारला भयान पट हा.. गरजांची बुळबुळ, स्वप्नं रुसे
ईश्वरतेचे अन् जातीधर्माचे.. नाटक सगळे जगी विलासे

नश्वरतेने सहज सोपे केले.. माझे इवलेसे जगणे असे
शरीरमनाच्या ओढीला देवू.. उगा कशाला व्यर्थ खुलासे

येईल कशी पापण्यांना नीज.. पुन्हा स्वप्नं आज नवे दिसे
मज हाकेला प्रतिसाद जसा.. सुगंध तुझा वाऱ्यासवे येतसे

- सई

Monday, September 23, 2013

प्रार्थना

हा पदर तो पदर
उसवलेले धागे..
कसलीशी मुकाट
दाबलेली सल..
ऊन सावल्यांचे
भलावण कवडसे..
अंगावरून सरकून
गेलेले रानवारे..
फुलांचे धीट इशारे
वाटांचे धुमारे..
सारे सारे स्मरू दे..
बोटांचे वेडे छंद
अन् लाघव बटांचे..
साठलेले विसर
विसरलेले आठव..
सारे सारे झरू दे..
पुन्हा रे वितळू दे
पाणी नितळू दे..

- सई

Sunday, September 22, 2013

वेड

सांज कोवळी गं सये कशी जाहली
फुलांचे हसू, सई अशी वेडावली..

कुठे जावू मना कुठे ठेवू तुला
दशदिशा हिंदोळती, पूर थोरला..

अनिमिष नजरांची ती भेट वेंधळी
डोळ्यांत उतरलेली रात्र आंधळी..

पापण्यांच्या पार, रंग निळा रंगे
स्वप्नं संगाचे.. पाण्यावर तरंगे..

पेट घेत उठे रे आस दाबलेली
आत्मार्पणाची ओढ ताणलेली..

- सई

Friday, August 23, 2013

काजळ

नीज पणाला लागते
मुक्या चांदण्या नभात
कशी जीवाला झोंबते..
ओल्या काजळाची रात

ओढावल्या वादळात
गळे काजळओल गाली
माझे रूप आरशात..
वेड्या भुताची सावली

स्वसुगंधाने वेडावली
राऊळी मनाच्या खोल
काजळात बुडालेली..
स्वप्नगंधाची फूलवेल

स्वप्नांची पारध भोळी
दिव्य भासांची पहाट
अशा काजळाच्या वेळी
उठे प्रारब्धाची लाट..

काळजी वाटे गं जीवाची
काळराती लागे झळ
उडे रे राख काजळाची
काळजात उठे कळ..

माधवाsss..
उडे रे राख काजळाची
काळजात उठे कळ..

- सई

समर्पण

ये नज़्म मेरे पियां के लियें गाती हूं..
ज़ालिम का नाम आज ले ही लेती हूं..
'अमीर ख़ुसरो'.. मोरे निज़ाम..

तेनूं नूर-अला-नूर.. सोना रब आंखें..
जिठ्ठा कोई नैइं तेरी मिसाल वरगा..
तेरी मिस्ल.. ते रह गय़ी इक पासें..
दुजां होंर नैइं तेरे बिलाल वरगा..


घेत तुझे नाव, किती झेलली रे वादळे..
तुझ्या आठवांचे चांदणे, नभी अंथरले..

शब्दांच्या वळणांची, अशी लाट उसळली..
तुझ्या नजरेतली वीज, काळजात उतरली..

तुझ्या मनाचे उमाळे, ओढ प्राणास लावी..
रानफुलांच्या साक्षीने, व्हावी मिठी हळवी..

अशा दैवी प्रार्थनांनी, केलीस रे आर्जवे..
कशा बंदिशी बांधल्या, जिवाच्या सवे..


ये मोरी चुनरीयाँ पी की पगरीयाँ..
मोहे दोनो बसंती रंग दे निज़ाम..
और कोई मोहे रंग नहीं भायें..
मोहे अपने ही रंग मे रंग ले निज़ाम..


ताईताच्या पेटीत, कुराणाच्या ओळी..
चोरलेला मंत्र, गळ्यात 
स्वप्न माळी..

माटी के तुम दिंवरें, सुनों हमारी बात..
आज मिलावरां पीयां का, जगीयों सारीं रात ..
मोहे अपने ही रंग मे रंग ले निज़ाम..
तू हैं साहिब मोरा मेहबूब-ए-इलाहि..

कुराणाची पाने उजळती, समईच्या उजेडात..
अस्तित्वंच माझे, पाणी पाणी होत जातं..

नको न्याहाळूस असा मला, मी भारावले..
असा नको रे हासूस, जीवाचे चांदणे झाले..

खुळ असे लावले, खुळी झाले रे मी भोळी..
माझ्या प्राक्तनभाळी, तुझ्या नक्षत्रांच्या ओळी..

दुःखाला रे माझ्या, तुझ्या चांदण्यांची ओल..
आसवे हसाया लागली, झरा झाली पानवेल..

ख़ुसरो रैन सुहाग की, जागी पी के संग..
तन मेरो मन पियो को, दोउ भए इक रंग..
ख़ुसरो दरियां प्रेम का, जो उलटी वाह की धार..
जो उभरा सो डूब गया, जो डूबा सो हो पार..

- अमीर ख़ुसरो-मय सई..

Tuesday, August 13, 2013

गोंदण

समईच्या प्रदेशाला
जाई जुईचे तोरण
मज पणतीला हवी
मुक तेलाची राखण

माझ्या निराशेला
तुझे स्वप्नंझुंबर
तुज हातांची सय
माझ्या नभावर

झाडांची माया 
शी
तुझी फुलांची काया
कशी घेऊ पदरात
वारा लागे रे शिराया

क्षण मोजणीला या
कधी लागते रे धार
येतो पूर कधीतरी
उमाळ्यांना नदीपार

पुढ्यातल्या चंद्राला
घेते कुशीत खोल
निळ्या पाठीवर या
तू गोंद चांदणवेल

- सई

Wednesday, July 31, 2013

अंतप्रहर

हवेत झप्पर उडवुन छप्पर
गेला वारा माळावर तत्पर
शब्दपाण्याचा झोत सारुनी
आत उगवला काळा पत्थर

घेत गिरकी पिसाट भिंगर
जात लयाला हाकेची लकेर
उजाडावरती हिरवट काळी
तरी उगवते आस रानभर

अशाच वेळी टांग जीवाचे
अनाम सुंदर काळे झुंबर
रात्र सजवाया मी गुंफते रे
वांझ स्वप्नांची मंद झालर

काही केल्या होत नसे रे
इंद्रियांची भलावण तत्पर
डोळा पाणी आण नाहीतर
टाक पुन्हा मायेचा मंतर

- सई

Sunday, July 28, 2013

एकांतप्रवास

चारचौघांमधे उठताबसता
विसरायला झालेलं सत्वं
संभाषणतोल जपताजपता
उथळ झालेलं माझं बोलणं..
हलक्याशा दगडगवतातून
खुळखुळणारा जीवाचा झरा
तीव्र कडाउंचीच्या अंतराने
कर्णकर्कश धबधबा होतो रे..

नात्यांमधल्या अडचणींवर
काढलेले यंत्रतांत्रिक उपाय
उमाळ्यांना थारा नाही मग
समंजसपणे जुळवून घेणं..
रानफुलांची शेती केलेली
पाहिलीयेस का तू कधी?
बांध घालून गवताबरोबर
कसं झुलता येईल त्यांना..

कंटाळलेले रे मी तशा
गर्दीतल्या एकटेपणाला
मोकळी झालेय कधीच
त्या जखड एकटवासातून..
अंधाऱ्या हिमरानातल्या
या खोल दरीतूनच जसं
गरूडाला ऐकू यावं धुंद
मरणभुलीचं संगीत..

मुक्तपणे अनुभवतेय
समृद्ध एकांतवासात
कलावंतांच्या सोबतीने
अन्‌ जीवाच्या साक्षीने..
शेवाळलेल्या पाण्याने
ओल मिळेना म्हणून
पाखरं उडून आलीयेत
या वाहत्या झऱ्याकाठी..

गर्दीतल्या एकटेपणापासून
एकांतवासापर्यंतचा प्रवास
उलटपावलांनी पुसून आज
तू परतायला सांगतोयेस?
कालही पाऊस पडला इथे
पुन्हा फुटून वाहतंय पाणी
त्याला तुझ्या त्या जगाचे
बांध घालू म्हणतोस?

नाही जमणार मला..

जग सारून ये म्हटलं
तर येशील तू इथे?

वाट नाही पाहत मी आता..

- सई

Wednesday, July 17, 2013

स्पर्श

आसावलेली रात
डोळा नाही नीज
स्पर्श स्वप्नातले
मागताती वीज

काळोख काठावर
हले वाऱ्याने रान
शिरे गाभाऱ्यात
तुझे चांदण-ऊन

कधी याच गावी
स्पर्श भारावलेले
माझ्या प्राक्तनाचे
आभाळ सांडलेले

आता जाग नाही
सुन्न साऱ्या ग्रंथी
बर्फाचे घर माझे
हरवले सर्व साथी

बर्फाचे घर माझे
हरवले सर्व साथी..

- सई

Friday, July 12, 2013

संचित

विजनवासी संचितातल्या
काही फटींमधुन
निसटणारा वारा
सोडला तर
शरीराला
कसली गुंतवण नाही.

किड लागू नये
म्हणुन घरातल्या
धान्याबरोबर
परसदारात
आतडीही
वाळू घातलीयेत.

धग कमी होऊन
कुज
फोफावणार नाही
याची व्यवस्था
आत्मजाळाने
सांभाळलीय.

अन् स्वप्नमाळेतुन
ओघळून
वितळणाऱ्या
निरासक्त क्षणांचे
मणी न्याहळत
मी उभी आहे..

..काठावर.

- सई

Thursday, June 20, 2013

विचार

विचार..
चाललेल्या वाटेचे
सोडलेल्या मुक्कामाचे
पुढ्यातल्या वळणांचे
जन्माआधीचे, जन्मानंतरचे..
thoughts flow like.. river

विचार..
डोळ्यातल्या बाहुल्यांचे
मनातल्या चांदण्यांचे
स्वप्नांच्या फुलोऱ्यांचे
आभाळझेपेचे, मुक्तपणाचे..
thoughts flow like.. fountain

विचार..
झपाटलेल्या वादळांचे
मेंदुतल्या विस्फोटांचे
तडकलेल्या नसानसांचे
बिथरण्याचे, भरकटण्याचे..
thoughts flow like.. wind

विचार..
प्रेमातल्या प्रतारणेचे
भोगातल्या मरणाचे
स्वतःच्याच खूनाचे
शीलतेचे अन् अश्लीलतेचे..
thoughts flow like.. drainage

विचार..
दुःखातल्या शांततेचे
सुखातल्या गोंधळाचे
एकांताच्या धुरकटण्याचे
अस्तित्वाचे अन् क्षुद्रतेचे..
thoughts flow like.. fog

- सई

Saturday, June 8, 2013

रुसुबाई

आलीस का रुसु बाई रुसु?
किती गं रडलीस मुसुमुसु
आण बरं जरा गालात हसु

बघ मी आणलंय तिरामिसु
खा कि गं आता नको आसु
लई ग्वाड हाय हे तिरामिसु

चल आता मस्त खेळत बसु
चुरुचुरु चराचरा बोलत बसु
नि बाहुल्यांच्या खेळात फसु

बघुन आम्हाला असं वेडंपिसु
दोन चोंबड्या करी खुसु-फुसु
आवरत नाही बाई आता हसु

- सई

Wednesday, June 5, 2013

धुकं

ओले मेघ उरी झुरती
फुटोनी कोसळाया;
वीज जणु शुभ्र होते
प्राणांना उजळाया..

सरी येती देत जाती
भिजण्याचे बहाणे;
पान फुल झाड हले
घालताती उखाणे..

कवेत घेती आज मला
पाझरत्या पाऊसधारा;
चिंब मनाचे रान झाले
वाऱ्यावरती मोरपिसारा..

विझून गेले ऊन जीवाचे
वैशाखाचा व्याकूळपणा;
मागती तरी धूळ माती
निळाईच्या स्वप्नखुणा..

- सई

Sunday, June 2, 2013

पाचोळा

कालच्या संध्याकाळी
जीवाच्या सख्यत्वाने
दाही दिशा धुंडाळून
ओले ढग आणले त्याने.
आणि मग पाऊस पडावा
म्हणुन श्वास रोखून
शांत झाला.. वारा.
पावसासाठी सगळे स्तब्ध
पण तो काही बरसेचना
काय झालं कुणालाच कळेना.
ढगांच्याआड खोल विजा
चमकत राहिल्या फक्त
..कितीतरी वेळ.

आणि इकडे त्याच्या चाहुलीने
मातीची अशी उत्कट अवस्था..
वेडी! तो येण्याआधीच
अनावृत्त होऊन बसलीय..
खूप तरसलीय रे ती.
पहिल्या पावसाच्या
फक्त आठवणीच आहेत
तिच्याकडे आता.
कसा रे असा तिचा साजण ?
त्याला कसली जाणच नाही.
त्याच्याकडेच पाणी आहे
म्हणुन इतका अभिमानी ?
कि त्याच्याच पाण्याने
ओली तंद्री लागते त्याला ?
तुही असाच माधवा..
कुठल्या तंद्रीत कुठे
निघून गेलास रे ?
पाणी मागत राहीले मी..
बरसलाच नाहीस तू कधी.
मागे एकदा आलेलास
तर असाच.. स्तब्ध!
जसा कालचा पाऊस.

मग मातीचा सखा
वाराच पुन्हा सरसावला.
झुळुकींची भुलावण
देत सुटला.. ढगांना
विजांना.. झाडांना..
मग पावसाची तंद्री
हलकीशी ढळली.. अन्
टप् टप्.. टप्.. टप्..
पाझरायला लागला तो.
..तसा खूप वेळ
जीव आवरून धरलेला
एक पक्षी उठला आणि
सगळ्यांना सांगतच सुटला
तो आलाय.. तो आलाय..
पहिल्या चार थेंबानेच
माती भान विसरून
दरवळू लागली..
सगळा आसमंत
भारून टाकला तिने
त्या धुंद वासाने..
खुळ लागलं रे मला
तिचं असं.. इतकं
सुगंधी प्रेम पाहून.
आणि माझ्या परसातला
माझा वसंतसखा
मोगरा लाजला रे..

चार थेंबांचा शिडकाव.. बस्स्.
..आणि निघून गेला तो.
विश्वासच नाही बसला
कुणाचा त्याच्यावर.
माती तर ठार वेडी
णु तो बरसतोयच
अशीच दरवळतच राहीली
रात्रभर.. झपाटल्यासारखी.
मग तिचाच सुगंध तिला
सहन होईना झाला रे..
पण काय करणार ती तरी.
माझंही असंच व्हायचं माधवा..
तुझ्या येण्याच्या झुळुकीने
स्तनाग्रांमधे दाटून यायची
उत्कटता.. आणि त्या उभारीने
तिथला एकुलता तीळ
सलत रहायचा.. खूप वेळ.
तेही जाणवायचं नाही मला
त्या धुंदावल्या अवस्थेत.

पण तू आलाच नाहीस.
कालचा पाऊसही तसाच..
मातीचा निर्दयी साजण.
इतका दुःख-उदासी
..का रे तू साजणा ?
तुझं काहीच कसं
कळत नाही मला.
इतका किचकट..
इतका अनाकलनिय कधी
आणि कसा झालास तू ?
..कालच्या पावसासारखा.
प्रेमाची कदरच नाही का रे ?
मातीच्या आणि माझ्याही.
तिचा-माझा, दोघींचा सखा..
फक्त वाराच आहे. पण,
त्याला अंग नाही रे साजणा
कवेत नाही घेता येत त्याला.
भिरभिरणारा जीव त्याचा
याच दुःखाने भरकट राहतो तो..
पण जीवाने येतो पुन्हा, पुन्हा
मला ओल द्यायला..
मातीचा वास दरवळायला..
पण त्यासाठीही त्याला
तुझेच चार थेंब लागतात.

गेले रे आता ते दिवस..
आता पुन्हा नाही
..कधीच नाही.
पारावरचा.. पाराखालचा..
तो पाचोळा पाहतोयेस ना तू.
तुझ्या चार थेंबानी
हललाही नाही तो. आणि
तू आता कोसळलास तरीही
..तो असाच राहील.
आता कधीच त्याला
ओल फुटणार नाही.
माझ्या स्तनांचे चंद्रही
गेल्या मोसमात कापून..
देऊन टाकलेत मी तुला.
मलाही नाही कधी
ओल फुटणार आता.
तुझ्या प्रतीक्षेत..
पाचोळा झाला रे माझा.
पाचोळ्याला कशी फुटेल ओल.
पण खरं दुःख तर हे आहे कि,
पाचोळ्याला मरणही नसतं रे..
प्रतीक्षा.. फक्त प्रतीक्षा..
पण कुणाची.. कशाची ?
तेही माहीत नसतं त्याला..

- सई

Saturday, June 1, 2013

खेळ

वाऱ्याचे अंग      असे निःसंग
नातेगोते माझे   तसे राखरंग

विटके मिटके     समईचे दिवे
आत येणेजाणे   जुनावले नवे

दिठीच्या भेटी    आभाळी उडाल्या
मनाच्या गाठी   तुटल्या सुटल्या

वेडावत आल्या   कालच्या साऊल्या
झपाटून मेल्या   खेळाच्या बाहुल्या

- सई

जीवsरूss

स्वप्नाळू पापण्यांचं,
आभाळफेक झेपेचं,
लपापत्या छातीचं..
माझं पाखरूss


गाईच्या डोळ्यांचं,
अडखळ पायांचं,
बावऱ्या भितीचं..
माझं वासरूss


दुडक्या चालीचं,
चुकल्या वाटेचं,
अनावर ओढीचं..
माझं कोकरूss


देवाच्या गाण्याचं,
पाऊस पाण्याचं,
चांदण गावाचं..
माझं जीवsरूss


- सई

सई

निळे चंद्र माझे अन्‌ मंद चांदण्या
काजळ ओले तरीही शांत पापण्या
आंधळा खेळ सये खुळ्या बाहुल्या
खोल डोह साऱ्या साजणी बुडाल्या

- सई